स्वप्न

रात्रंदिन मनी माझ्या स्वप्नांचा गराडा
कुणा सांगु कसा पडे शब्द माझा थोडा
कापराची पोत यांची ही मुठीतली वाळू
वास्तवाच्या वाळवंटी मनी वसे मृगजळू

दिवास्वप्न माझी घेती गरुड भरारी
झिंकुन सागरा गाती गर्वगीत सारी
अव्वल मी सदा मोडे स्पर्धकांची खोड
सर्व सुखी पूर्ण होई शेवटही गोड

काळदिनी होई यांचा रंग हा करडा
भयछटा दाखवती अन मत्सरही थोडा
कल्पना ही काळी आत्मविश्वासाचा घात
एकला रे चलो दुष्टशंकेच्या व्युहात

रात्रस्वप्नांचा तमाशा मन पाहे बंद डोळा
सर्व फिकट या रेषा इच्छा विचार धांडोळा
पापण्यांचे पाहुणे हे पानी दवबिंदु जसे
अस्पर्श मोती साज हाती धुके येई कसे

मात्र स्वप्न तुझी येता होते फरफट माझी
भाव, रंग, चव त्यांना किर्र जंगलाची
अंगोअंगी रुते जणु स्वप्नकाटा धारदार
सुटका हि करी माझी दिस होऊन उदार

Advertisements

संवेदना

बोथटलेल्या संवेदनांनी
वेचतोय सरासरीतल सुख
जाणिवेची पराकाष्ठा हीच
की जाणवत किती नाही

त्यासाठीही हवी
डोळसांची शब्द्काठी आणि
अंतर्मुख करणारी
एक सणसणीत श्रीमुखात

प्रश्न पडतापडता
भुकांचे राक्षस जागे होतात
इंद्रियांची तोंड उघडून
त्या प्रश्नांचाच फडशा पाडतात

कापरासारख स्फुरण माझं
पेटलो तरी क्षणभरच
नाहीतर विरातोच आहे
हळूहळू शून्य होत

पेटायचंय धडाडून एकदा
समजुन उमजुन घ्यायचाय एक श्वास
ओळख एका श्वासापुरती तरी
स्वतःची होऊदे

पाउस

सकाळच  कोवळ उन
आता धुसर झालं आहे
विजा चमकतायत वारा वाहतोय
आभाळच जणु धुवायला काढलं आहे

शांतपणे पाउस बघावा म्हणून
मी पकडतो एक कोपरा
सोबत गळणार्‍या  पागोळ्या
वारा थेंबांनी भारावलेला

सरसर  पावसाचा आवाज
टपटप थेंबांची तालात
वाऱ्याबरोबर उडतायत काही
काही नाचतायत कुंपणावर

पावसाचा ताल धरू म्हंटलं
तर तो काही सापडला नाही
विजा सगळ्या चमकतायत सारख्या
पण आवाज एकीचा सारखा नाही

एकटा जरी बसलो होतो
तरी वर्दळ डोक्यात झाली होती
पाउस वेडा वाजतंच होता
डोक्यात विचारांची झुंबड होती

वेडेवाकडे वाटेल तसे विचार
थेंबाला एक या हिशोबानी
भविष्याचे भुताचे चांगले आणि वाईट
तर काही बिना लेबलाचे

छान वाटत होत

अशा वेळी शब्द नको वाटतात
प्रश्नांचा तर रागच येतो
आतल आणि बाहेरच संगीत
तेवढं गोड वाटत

पण घरात सर्वांची लगबग
आत्ताच तर सुरू होईल
अंगणात तुंबलेल पाणी काढायची
आत्ताच तर घाई होईल
(जणू त्या पाण्यानी जगबुडी होणार आहे)

गळणाऱ्या छताखाली
फाटक फडक ठेवायचं असेल
कोणीही पावसात भिजू नका
असा एकच ओरडा असेल

या सगळ्या व्यवहारात
पाउस बघत बसणं मूर्खपणा ठरतो
कटकट कोणाला हवी आहे
मी उठून आतल्या खोलीत जातो

पाणी आत येऊ नाही म्हणून
इथेही खिडक्या उघडायच्या  नाही
कमीतकमी इथे कोणी बोलत तरी नाही
चांगलं नाही आणि वाईटहि नाही

पावसाचा आवाज मात्र येतोय
खूप दुरून आल्यासारखा
हातपाय ताणून मी एक मस्त आळस देतो
जाणवत राहते खोलीतली उब
(का आहे ही खोली एवढी उबदार आणि सुरक्षित)

ही उब दिली आहे आपल्याला
बाहेर व्यवहार संभाळणार्‍यानी
त्यासाठी सोडतायत ते
त्यांच्या वाटच्या पावसावर पाणी

थेंबभर विचार
थेंब थेंबांचा झाला पाउस
पावसाशी बोलता बोलता झालो
पावसाइतकाच निःशब्द

रघुनाथ पंडित: चुक की बरोबर?

तदितर खग भेणे वेगळाले पळाले,
उपवन जल केली जे कराया मिळाले,
स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो,
कठीण समय येता कोण कामास येतो………?

विस्कटलेली माया

वस्तुस्थितीच्या वाळवंटात स्वप्नांच मृगजळ
निरागस पाठलाग आणि त्याला निराशेच फळ
दिवास्वप्न फस्त करे उघड्या डोळयांची दुनिया
स्वप्न तुटून उरे फक्त विस्कटलेली माया

आमचं दिवंगत प्रेम

आमच्या दिवंगत प्रेमाची
असते रोजच पुण्यतिथी
दिवस मौन श्रधांजली
रात्र एकटी आसू गाळी

आमच्या दिवंगत प्रेमाखातर
भरली जंगी शोकसभा
स्वतःची स्वगत ऐकायला
प्रत्येक मीच उभा

आमच्या दिवंगत प्रेमाची
मिळणार म्हणे भरपाई
होत्या गाई थोर किती
सांगतायत हळहळणारे कसाई

आमच्या दिवंगत प्रेमानी
दिलाय एकटेपणाचा वारसा
सामोरा येऊनही हसत नाही
माझ्या ओळखीचा आरसा

आमच्या दिवंगत प्रेमाची
आठवण जाता जात नाही
येता जाता प्रत्येक क्षण
आठवून देतो नवीन काही

आमच्या दिवंगत प्रेमाला
देईन आयुष्या सरण
माझ्याच हातून आलंय शेवटी
माझ्या प्रेमाला मरण

कोण मी? आणी का?

माझ्याकडे प्रश्न आहेत सध्या आणि उत्तर सुद्धा काही.
पण सगळीच तेरड्य़ाचि फुलं, रंग, कधी सुगंध नाही

मग परत एकदा सुरू अथक, अहनिहर्श मंथन मनी
मी मेरू मन्दार आणि माझ्याच वासनांचा वासुकी

कोणते देव आहेत मनात, आणि लपलेले दानव कोण
अमृत काय आणि काय विष, पहिला घोट घेणार कोण

मिळतिल उत्तर सगळी , संपतील प्रश्न सारे
शान्ततिल मनातल्या मनात, सोसाटयाचे वारे

पण प्रत्येक उत्तर एक नवीन प्रश्न घेउन येतं
आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच असं नसतं!